१००, २०० रुपयांपर्यंत विकले जाणारे मासे तुम्ही पाहिले असतील, पण ज्या माशाची बाजारातील किंमत दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत आहे, अशा माशाचे नाव तुम्ही ऐकले आहे का? असाच एक मासा आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर पकडण्यात आला असून, त्याचा बाजारभाव २.१० लाख रुपये आहे.
आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर एका मच्छीमाराला कचिरी नावाचा मासा सापडला. त्याचे वजन २६ किलो असल्याचे सांगितले जात आहे. या मच्छीमाराने यापूर्वी अनेक मासे पकडले होते, पण या एका कचिरी माशाने त्याला रातोरात लखपति बनवले. या माशाचा उपयोग औषध निर्मितीत खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि हा अतिशय विलक्षण प्रकारचा मासा आहे.
हा मासा पकडल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत त्याची बोली लावण्यात आली. या निविदेत राज्यातील अनेक बड्या व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आणि कचिरी मासळीचा भाव २ लाख १० हजार रुपयांवर पोहोचला. त्यानुसार प्रतिकिलो मासळीचा भाव जोडला तर आठ हजार रुपये किलो दराने बाजारात कचिरी मासळीची विक्री झाली. कचिरी माशाने या मच्छीमाराचे आयुष्य बदलून टाकले.
कचिरी मासा दिसायला काळा दिसतो, जो क्रोकर प्रजातीचा आहे. दिसायला कुरूप असलं तरी बाजारात त्याची किंमत लाखो रुपये आहे. म्हणूनच याला गोल्डन फिश असेही म्हणतात.
नर कचिरी मासे समुद्रात क्वचितच आढळतात आणि त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात असे म्हटले जाते. माशाचा काही भाग, पित्ताशय आणि त्याच्या फुफ्फुसांचा उपयोग त्यापासून धागे तयार करण्यासाठी केला जातो, ज्याचा वापर डॉक्टर शस्त्रक्रियेदरम्यान टाके घालण्यासाठी करतात.