Friday, May 10, 2024
कृषीSugarcane Farming : महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारने घेतला हा...

Sugarcane Farming : महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. शाश्वत उत्पन्न देणारे पीक असल्याने अलीकडे या पिकाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात या पिकाची लागवड केली जाते. या भागात अलीकडे उत्पन्नाची हमी देणारे पीक म्हणून ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

मात्र ऊस उत्पादकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ऊस उत्पादकांना ऊसतोड मजूर आणि ऊस वाहतूकदारांकडून नेहमीच लुटले जाते. याशिवाय कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचीही लूट करण्यात येते.

ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यात ऊसाच्या वजनात घोळ घातला जातो असे आरोप गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. कारखान्यातील उसाच्या वजनात मोठी तफावत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या काटामारीने ऊस उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता साखर कारखान्यातील काटे ऑनलाइन करण्यात येणार आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी यासंदर्भात बैठक घेतली. विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्ये सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वाची बैठक पार पडली होती. राज्यातील सर्व साखर कारखान्यांची वजन काटे ऑनलाइन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश जारी केले आहेत.

परिणामी पुढील हंगामापासून ऑनलाइन वजन काटे झाल्यानंतर शेतकऱ्यांची ही देखील समस्या मिटली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, या ऑनलाइन वजन काट्यांची रचना अशा प्रकारे करण्यात येणार आहे की, वजनकाट्यावर ऊस गाडी वजनास आल्यानंतर त्या ऊसाचे वजन एकाच वेळेस शेतकरी, साखर कारखाना व साखर आयुक्त यांना करणे शक्य होणार आहे.

तसेच या ऑनलाइन वजन काटामध्ये कोणत्याही कारखान्याने छेडछाड केल्यास त्यावर साखर आयुक्तांचे नियंत्रण असल्याने त्यांना तत्काळ तसा संदेश पाठविण्याची व्यवस्था असेल. अर्थात अशा प्रकारे यंत्रणा विकसित केल्यास ऊस उत्पादकांना फायदा होईल आणि त्यामुळे पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, शेतीवाडी च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

दिवसभरातील टॉप न्यूज़